क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आज फातोर्डा स्टेडियमवर होणाऱया एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढतीत स्पेनचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा हे केंद्रस्थानी असतील. लॉबेरा यांनी आयएसएलच्या तीन मोसमात एफसी गोवाची फेरबांधणी केली होती. आता ते एफसी गोवाचे प्रतिस्पर्धी असतील.
लॉबेरा यांनी मुंबई सिटीशी करार केला आहे. त्याआधी ते गोव्यात रमले होते. हे आपले घर असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली होती. आता ते कॅमेरासमोर आपली भावना दाखविणार नाहीत, पण गोव्याची ओळख आणि लौकीक निर्माण केल्याचे समाधान त्यांना वाटत असेल. फातोर्डा स्टेडियमवर त्यांनी गोव्यासाठी प्रशिक्षक म्हणून काही अविस्मरणीय प्रसंग साकार केले. सुपर कपच्या जेतेपदासह बाद फेरीतील प्रवेशाची कामगिरीही त्यांनी नोंदविली.
लॉबेरा यांच्या कामगिरीची दखल भारतीय फुटबॉलमधील प्रमुख खेळाडूंनी घेतली आहे. लॉबेरा यांची सकारात्मक छाप पाडून एफसी गोवाच्या संघात परिवर्तन घडले. त्यांची खेळण्याची शैली मला आवडते आणि त्यांनी एफसी गोवा क्लबसाठी भक्कम पाया रचला, असे अर्जुन पुरस्कार विजते ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी म्हटले.
लॉबेरा गोव्यात आले तेव्हा एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने त्यांना मोकळीक दिली. त्यांनी खेळाच्या शैलीत बदल केला. फॅर्रान कोरोमिनास आणि अहमद जोहू असे खेळाडू त्यानी आणले आणि घडविले, असे भारताचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू क्लायमॅक्स लॉरेन्स म्हणाला. एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य ओमी हा लॉबेरा यांना एफसी गोवाच्या यशाचे श्रेय देतो. त्यांचे योगदान संघाला अधिक गुणवान बनविण्यात मोलाचे ठरल्याचे तो सांगतो. लॉबेरा यांच्यामुळे खेळाडूंचा चेंडूवर ताबा ठेवण्याचा आत्मविश्वास उंचावला, असे संघाचा एक चाहता सॅनरॉय डिसोझा म्हणाला.
.