विषाणूच्या इतिहापासून उपचार, सामाजिक पैलूंचे अध्ययन सामील : भविष्यात साथ रोखण्यासाठी मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना नव्या सत्रापासून कोविड-19 महामारीविषयीही शिकविले जाणार आहे. एमबीबीएसमध्ये 80 तासांचा महामारी व्यवस्थापन हा नवा अभ्यासक्रम जोडण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या इतिहासापासून उपचार, सामाजिक आणि कायदेशीर पैलूंचे अध्ययन सामील आहे. विकसित देशांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना महामारी व्यवस्थापनाचे धडे देण्यात येतात.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना महामारीदरम्यान संसर्ग नियंत्रण, रोग व्यवस्थापन, महामारी व्यवस्थापन, संशोधन, संवाद आणि देखभालीविषयी शिकविले जाणार आहे. याचबरोबर आतापर्यंत फैलावलेले रोग म्हणजेच प्लेग, कॉलरा, एशियन फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू, एचआयव्हीसह कोविड-19 ची प्रकरणे, बरे होण्याची प्रक्रिया, मृत्यूदरावर नियंत्रण यासंबंधीचे शिक्षणही देण्यात येणार आहे.
कोरोनावर कशाप्रकारे मात करण्यात येतेय, याचीही माहिती देण्यात येणार आहे. याच्याशी संबंधित यशस्वी प्रकरणे सामील केली जाणार आहेत. तर कोरोनाकाळात झालेले वैद्यकीय संशोधनही मांडण्यात येणार आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) संचालक मंडळाने हा महामारी व्यवस्थापन अभ्यासक्रम सादर केला आहे. भविष्यात एखादी महामारी फैलावल्यास त्याला सामोरे जाण्याकरता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
नमुनासंग्रह, एन-95 मास्क
संसर्ग कशाप्रकारे नियंत्रित केला जाऊ शकतो हे या अभ्यासक्रमात शिकविण्यात येणार आहे. नमुने जमविणे, आरटी-पीसीआर, अँटीजन रॅपिड टेस्ट, आयसीयू मॅनेजमेंट, क्वारंटाईन, होम आयसोलेशन, मृतदेहावरील अंत्यसंस्काराची पद्धत, सोशल डिस्टन्सिंग, एन-95 मास्क, पीपीई किट, उपचार आणि लसीकरणाचा मुद्दाही यात सामील करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रमादरम्यान एकूण 80 तासांचे शिक्षण यावर करावे लागेल. कम्युनिटी मेडिसीन, फार्माकोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी इत्यादी विभागांच्या मदतीने हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.