नवी दिल्ली
दक्षिण कोरियन कंपनी ‘एलजी’ आता आर्टिफिशयल इंटेलिजेंस (एआय) (कृत्रिम बुद्धीमता) आधारीत सेवा विकसित करण्याची योजना बनवत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाची दूरसंचार ऑपरेटर केटी कॉर्पसोबत सदरची योजना विकसित करणार आहे. एलजीने आपला मोबाईल व्यवसाय पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे.
आपला मोबाईल व्यवसाय बंद करण्याच्या घोषणेनंतर एलजी पुन्हा जोमाने कामाला लागली असून याअंतर्गतच एआय सेवा विकासाचे कार्य हाती घेतले जाणार आहे. एआय सेवांचे समर्थन करणाऱया सेवांच्या व्यावसायिकीकरणाची योजना बनवण्यात आली आहे.
योनहाप या न्यूज एजन्सीनुसार एलजी स्मार्ट होम सोल्युशन्ससंबंधीत केटीच्या एआय सोबत काम करणार आहे. सदरची कंपनी रेडियो, संगीत आणि इतर डिजिटल सेवा पुरवत असते. याच त्यांच्या सेवेचा उपयोग एलजी आपल्या ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी भविष्यात करणार आहे.
एलजीचा स्मार्टफोन व्यवसाय बंद
एलजी इलेक्ट्रॉनिक्सने स्मार्टफोन निर्मिती आणि विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलैनंतर कंपनी स्मार्टफोनची निर्मिती आणि विक्री बंद करणार असल्याची माहिती आहे.
तोटय़ात मोबाईल व्यवसाय
एलजीकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये कंपनीच्या मोबाईल विभागाला मागच्या 6 वर्षांमध्ये 4.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 33 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये चालू कालावधीत मोठय़ा प्रमाणात स्पर्धा वाढत असल्याने हा निर्णय घेतला आहे.