प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. धनावडे यांचा जिल्हय़ात सलग तीन वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव होत आहे. धनावडे हे बी. कॉम, एलएलबी आहेत. 1991 मध्ये थेट भरतीत ते पोलीस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात काम केले. पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते. 2010 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. 18 वर्षे त्यांनी ठाणे पोलीस विभागात काम केले. यात उल्हासनगर, महात्मा फुले पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी निरीक्षक, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे यांचे रिडर या शिवाय कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्येही त्यांनी काही काळ सेवा बजावली. 1 जून 2017 ला ते सिंधुदुर्गात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रुजू झाले. या काळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खूनप्रकरण, साखर लूटप्रकरण आदीमध्ये उत्कृष्ट तपास करीत त्यांनी गुन्हेगारांना पकडले. सावंतवाडी कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी सुक्ष्म तपास करीत तत्कालीन कारागृह अधीक्षक व त्याच्या साथीदारावर स्वतः फिर्याद दिली. इतरही अनेक गुन्हय़ांचा तपास लावला. 3 मार्चपासून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या आधी कोसोवो व साऊथ सुदान – 2 युनायटेड नेशन-मिशनमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दोन पदके, 2018 मध्ये केंद्राकडून उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार, 2019 मध्ये पोलीस महासंचालक पदक आणि आता एकूण कारकीर्दीचा विचार करून मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.