मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या रेल्वे ट्रक निर्मितीचे काम हाती घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील विविध प्रकल्पांचे काम करणारी दिग्गज कंपनी लार्सन ऍण्ड टुब्रोला (एल ऍण्ड टी) मोठय़ा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी एल ऍण्ड टीला मुंबई-अहमदाबाद याच्या दरम्यान जवळपास 508 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेनच्या ट्रक निर्मितीचे कार्य सोपवले आहे. यातील काही टप्प्यातील काम कंपनीला मिळणार असल्याची माहिती आहे.
सदरचे कंत्राट मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर एल ऍण्ड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रम्हण्यम यांनी म्हटले आहे की,या नवीन प्रकल्पात आम्हाला काम करण्याची संधी दिल्याने हा सर्वात आनंदी, यशस्वी असा क्षण असल्याचेही स्पष्ट केले आहे. यावेळी भारत सरकार, रेल्वे मंडळ आणि एएचएसआरसीएल आदींचे कंपनीने आभार मानले आहेत.
समभागांची उसळी
इतक्या मोठय़ा प्रकल्पाचे काम मिळाल्याच्या बातमीने एल ऍण्ड टी कंपनीचे समभाग गुरुवारी दुपारी 12 वाजता 1 टक्क्यांच्या उसळीसोबत 1160 रुपये प्रति समभाग ट्रेडींगवर राहिले आहेत. मागील दोन सत्रात हे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.