प्रति समभाग 18 रुपये विशेष लाभांश
वृत्तसंस्था/ मुंबई
देशासह जगातील मोठमोठय़ा प्रकल्पांचे बांधकाम, अनेक उपकरणांची निर्मिती करणारी देशातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया लार्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) चा महसूल सप्टेंबर तिमाहीत 12 टक्क्यांनी घसरुन 31 हजार 35 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. परंतु सदरची घसरण झाली असली तरीही कंपनीने विविध ठिकाणच्या प्रकल्पांवर कार्यरत असणाऱया कामगारांची संख्या ही कोविडनंतर पुन्हा पूर्ववत केली आहे. कंपनीने यावेळी 18 रुपये प्रति समभाग विशेष लाभांशाची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय महसूलाचा आकडा
सप्टेंबर तिमाहीच्या नफा कमाईत कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील महसूल कमाई जवळपास 12 हजार 148 कोटी रुपयांवर राहिली आहे. एकूण महसूलाचा हा आकडा 39 टक्के असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. सहामाहीचा विचार केल्यास एकूण महसूल 52 हजार 295 कोटी रुपयांवर राहिला आहे.