वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील 5 महिन्यांपासून सुरू असलेला तणाव आणि चीन तसेच पाकिस्तानशी संबंध बिघडलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांशी भेट होऊ शकते. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या व्यासपीठावर ही भेट होणार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी मोदींची भेट होऊ शकते. रशियात 10 नोव्हेंबर रोजी ही परिषद प्रस्तावित आहे.
शांघाय सहकार्य परिषद भारतासाठी सुरक्षा आणि अन्य राजकीय मुद्दय़ांवर स्वतःचे लक्ष केंद्रीत करण्यासह दहशतवादासारख्या मुद्दय़ांवर स्वतःचे म्हणणे मांडण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. याचबरोबर सर्व देशांसोबत स्वतःच्या संपर्क यंत्रणेच्या पुढाकारात सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाचा आदर करण्याची बाबही भारत मांडू शकतो. 10 नोव्हेंबर रोजी शिखर परिषदेत भारतीय पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा होऊ शकते.
चालू आठवडय़ात भारत-चीन यांच्यात सीमा वाद आणि तणाव दूर करण्यासाठी सैन्यस्तरीय चर्चेचा आणखी एक टप्पा होण्याची शक्यता आहे. चीन-भारत वादात मध्यस्थी करण्याची इच्छा असल्याचे वृत्त रशियाने फेटाळले आहे. एससीओ व्यासपीठाचा वापर नेहमीच सदस्य देशांकडून परस्परांमध्ये विश्वास प्रस्थापित करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे रशियाने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची ही भेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
भारतातही बैठक
भारत नोव्हेंबरच्या अखेरीस एससीओ सदस्य देशांच्या शासनप्रमुखांच्या बैठकीचे यजमानपद स्वीकारणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रित करणार असल्याचे सरकारने यापूर्वीच म्हटले आहे. ही बैठक थेट सहभागाद्वारे होणार की नाही याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. 10 नोव्हेंबर रोजीच्या शिखर परिषदेत भारताकडून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेच्या समर्थनाची भूमिका पुन्हा अधोरेखित केली जाऊ शकते.