जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा
वृत्तसंस्था / मॉस्को
रशिया आगामी काळात जगातील सर्वात अत्याधुनिक एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणा भारत आणि चीनला पुरवू शकतो. रशियाच्या सशस्त्र दलांकडे ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर ती अन्य देशांना निर्यात केली जाऊ शकते असे रशियन फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल को-ऑपरेशनचे संचालक दमित्री शुगेव्ह यांनी सांगितले आहे.
एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणा जगातील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. स्टील्थ लक्ष्याला डिटेक्ट करण्यासह अंतराळातील उपग्रहांनाही नष्ट करण्यासह ही यंत्रणा सक्षम आहे. भारत याच क्षेपणास्त्र यंत्रणेची पूर्वीची आवृत्ती एस-400 रशियाकडून खरेदी करत आहे.
स्वदेशी स्वरुपात विकसित एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणेची पहिली खेप लवकरच रशियाच्या सैन्याला सोपविण्यात येणार असल्याचे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. आमचे जुने आणि परस्पर संबंध असलेल्या सर्व देशांबद्दल विचार करत असून यात भारत आणि चीनचा समावेश आहे. हे सर्व देश भविष्यात एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणेचे मालक होऊ शकत असल्याचे शुगेव्ह यांनी सांगितले आहे.
एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणेची निर्मिती रशियन शस्त्रास्त्र कंपनी अल्माज-एनेटी कॉर्पोरेशनने केली आहे. एस-300 आणि एस-400 या यंत्रणांची निर्मिती देखील याच कंपनीने केली आहे. एस-500 यंत्रणेपासून शत्रूदेशाची स्टील्थ लढाऊ विमाने देखील वाचू शकणार नसल्याचा दावा रशियाने केला आहे.
एस-500 यंत्रणेला मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. ही विमानविरोधी आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा पूर्णपणे नव्या पिढीचे अस्त्र म्हणून विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना त्यांच्या उड्डाण पथाच्या अंतिम टप्प्यात नष्ट करू शकते. याचबरोबर हायपरसोनिक विमान आणि मानवरहित यानांना नष्ट करण्यासही सक्षम असल्याचे रशियन सैन्याचे मेजरल जनरल बाबाकोव्ह यांनी सांगितले आहे.
600 किमीपर्यंतचा पल्ला
एस-500 क्षेपणास्त्र यंत्रणा 600 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना आणि सुमारे 500 किलोमीटर अंतरावरील लढाऊ विमानांना उद्ध्वस्त करू शकते. ही यंत्रणा अमेरिकेच्या एफ-35 लढाऊ विमानाला पाडविण्यास सक्षम असल्याचा रशियाचा दावा आहे. तर एफ-35ए लढाऊ विमान स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त असून कुठल्याही रडारकडून त्याचा थांगपत्ता लावला जाऊ शकत नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.