ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेे होते.
यानंतर फडणवीसांना उत्तर देताना, मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचे उत्तर द्यावे, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे अमृता यांनी एकेरी उल्लेख करत जगताप यांना उत्तर दिले आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, ‘ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचे नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्याला डिवचायचे नाही!’ अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना थेट इशारा दिला आहे.