प्रतिनिधी /बेळगाव
रसिक रंजनतर्फे प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमान्य रंगमंदिरमध्ये ‘ए मोहब्बत जिंदाबाद’ हा दृकश्राव्य कार्यक्रम झाला. गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगाव यामधील कलाकारांनी सुमधूर स्वरात गाणी सादर करून या दोनदिवसीय कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली. दिलीपकुमार यांच्या चित्रपटांतील संस्मरणीय क्षण पडद्यावर पाहण्याची पर्वणी रसिकांना यानिमित्ताने मिळाली.
दिलीपकुमार यांच्या आजाद, उदन खटौला, देवदास, मुसाफीर, नया दौर, मधुमती, यहुदी, कोहिनूर, मुगल-ए-आझम, गंगा-जमना, लिडर, राम और शाम, आदमी, संघर्ष आदी चित्रपटांतील गाणी कलाकारांनी सादर केली.
मध्यंतरात हेस्कॉमचे सुपरिटेंडंट इंजिनिअर सुधींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू उपस्थित होते.
प्रारंभी समन्वयक विनायक जाधव यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल चौधरी व श्रिया हुद्दार यांनी केले. याप्रसंगी रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.