सिलिंडरचा दर पोहोचला रु.900 पंधरा दिवसात रु. 50 ची दर वाढ
प्रतिनिधी /पणजी
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा एकदा भडकली असून त्याचा गोव्यातील दर रु. 898.50 पै. (रु. 900) एवढा वाढला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात महागाई वाढत असून गेल्या 15 दिवसातील ही दुसरी वाढ आहे.
गॅस सिलिंडरची किंमत रु. 25 ने वाढली आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी सिलिंडर रु. 25 ने महागला होता. म्हणजे गेल्या 15 दिवसात सिलिंडर रु. 50 रु. ने महाग झाला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर यांच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
एलपीजीवरील अनुदानही बंद
या इंधन वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून पगारदार मंडळींचा मासिक खर्च वाढला आहे. मिळकतीत वाढ न होता बऱयाच जणांना कोरोना महामारीमुळे आलेल्या आर्थिक मंदीत पगार कपातीच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. या गॅसवरील अनुदानही सरकारने बंद केल्यामुळे काही प्रमाणात मिळणारी भरपाई बंद झाली आहे. इंधनाचे सातत्याने वाढणारे दर बघितले तर त्यावरील सरकारचे नियंत्रण नाही, आणि ते पूर्णपणे सुटल्याचे दिसून येत आहे. इंधन कंपन्या वाटेल तसे दर वाढवत असून त्यांना जाब विचारणारा कोणीच नसल्याने जनतेला मात्र हात चोळीत बसण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.