काम जवळपास पूर्ण : जिल्हय़ातील कोविड रुग्णांना मोठा दिलासा : दिवसभरात 58 जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती
- जिल्हा रुग्णालयाला लागतात दररोज 250 ऑक्सिजन सिलिंडर
- नव्या प्लांटमधून उपलब्ध होणारा ऑक्सिजन स्टँडबाय म्हणून वापरणार
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
‘कोविड’च्या या महामारीत भविष्यात ऑक्सिजनची वाढती गरज आणि वाढते महत्व लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. दरदिवशी 58 जम्बो सिलिंडर एवढा मेडिकल ऑक्सिजन या प्लांटमधून उपलब्ध होणार आहे. कोविड आय. सी. यू. विभागासाठी बॅकअप म्हणून हा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जाणार आहे. या आठवडाभरात हा प्लांट प्रत्यक्ष कार्यान्वित होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
वेर्णे येथून होतो ऑक्सिजनचा पुरवठा
सिंधुदुर्गच्या जिल्हा रुग्णालयात कोविड येण्यापूर्वी महिन्याला साधारणपणे 100 सिलिंडर पुरे पडायचे. कोविडची आपत्ती कोसळल्यापासून या रुग्णालयाला एका दिवसासाठीच 250 सिलिंडर एवढा ऑक्सिजन लागतो. हे सर्व सिलिंडर वेर्णे (गोवा) येथून आणले जातात. या सिलिंडरच्या पुरवठय़ात काही अडथळा आला, तर स्टँडबॉय म्हणून उभारण्यात आलेल्या या नव्या प्लांटमधून दिवसाला 58 सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. या कोविड काळात जिल्हा रुग्णालयासाठी प्राप्त झालेली ही एक महत्वपूर्ण उपलब्धी म्हणून या प्लांटकडे बघावे लागेल.
ऐंशी टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी
ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक इस्पितळांमध्ये अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी राज्यात उपलब्ध होणाऱया ऑक्सिजनपैकी 80 टक्के ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी, तर 20 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी उपयोगात आणला जात होता. परंतु, सध्याची आणिबाणीची स्थिती लक्षात घेऊन शासनाने 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय उपयोगासाठी उपलब्ध करावा व 20 टक्के ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी वापरावा, असे आदेश दिले. त्यामुळेच आता कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन नियमितपणे पुरवला जाण्याचे मार्ग मोकळे झाले.
प्लांटची तातडीने करण्यात आली उभारणी
जिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वी कोल्हापूर येथून ऑक्सिजनचे सिलिंडर आणले जात होते. परंतु, कोल्हापूरलाच उपलब्ध होणारे सिलिंडर आला कोल्हापूरकरांसाठीच अपुरे पडू लागल्याने सिंधुदुर्गसाठी तेथून होणारा पुरवठा बंद झाला आणि आता वेर्णे येथून पुरवठा सुरू झाला आहे. या प्लांटवरून दररोज ऑक्सिजनने भरलेले 250 सिलिंडर आणले जातात. दिवस-रात्र रुग्णालयाची एक टिम हे सिलिंडर आणण्यात व्यक्त असते. मात्र या पुरवठय़ामध्ये कधी अडथळा आला, तर रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी स्वत:चा पर्यायी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्याची त्वरित दखल घेत पालकमंत्र्यांनी या प्लांटसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. त्यातून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभा राहिला. मागील पंधरा दिवसांत दिवस-रात्र एक करून हा प्लांट उभा करण्यात आला आहे. जो लवकरच कार्यान्वित होणार आहे.
चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न – जिल्हा शल्यचिकित्सक
या नव्या स्वमालकीच्या ऑक्सिजन प्लांटबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर म्हणाले, ‘हा प्लांट आम्हाला तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. या रुग्णालयासाठी ऑक्सिजनची गरज खूपच वाढली असली, तरी आतापर्यंत आम्ही पुरवठा कधी अपुरा पडू दिला नाही. मात्र भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी आम्ही आमचा स्वत:चा हा प्लांट उभा केला आहे. रुग्णांची संख्या कितीही वाढूदे, कोणत्याही स्थितीत ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही, याची खात्री बाळगा. असे ते म्हणाले. चांगल्या प्रतीचे जेवण, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा, पुरेसे बेड या महत्वपूर्ण बाबींची पूर्तता झाली आहे. आता डॉक्टर आणि इतर मनुष्यबळ देखील कमी पडणार नाही, या दृष्टीने लवकरच आश्वासक पाऊले उचलली जातील. रुग्णांना चांगल्यात चांगल्या सुविधा, उपचार मिळावेत, यासाठी आम्ही सर्वतोपरी मेहनत घेत आहोत.’