तीन दिवसांत होणार लोकार्पण : मंत्री जगदीश शेट्टर यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परिणामी ऑक्सिजनचा वापरही कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका विचारात घेऊन भविष्यात समस्या उद्भवू नयेत याकरिता इस्पितळांना ऑक्सिजनची मागणी करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे, अशी माहिती अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
विधानसौध येथे ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठय़ाबाबत वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रीय माहिती केंद्र हे सॉफ्टवेअर विकसित करत आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इस्पितळांना ऑक्सिजनची मागणी करता येणार आहे. येत्या तीन दिवसात या सॉफ्टवेअरचे लोकार्पण करण्यात येईल, असे शेट्टर म्हणाले.
राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत घट झाल्यामुळे उद्योगांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोंधळ निर्माण होवू नये, यासाठी जिल्हानिहाय नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात येईल. हे अधिकारी ऑक्सिजन पुरवठय़ाची जबाबदारी घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनच्या बाबतीत सज्जता असणे गरजेचे आहे. जिल्हा इस्पितळांना ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.