कणकवली
जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो (49) यांचे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डय़ुटी बजावताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पिंटो कुटुंबियांसह पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
पिंटो शुक्रवारी रेझिंग डेनिमित्त सहकारी पोलीस सावकार वावरे यांच्यासमवेत फोंडाघाट बसस्थानक येथे एका कार्यक्रमाला गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. वावरे यांच्यासह अन्य काहींनी त्यांना फोंडाघाट येथीलच खासगी दवाखान्यात नेले. परंतू, छातीतील वेदना वाढतच गेल्याने त्यांना खासगी वाहनाने कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केली असता पिंटो यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
पिंटो हे 1991 साली पोलीस सेवेत रुजू झाले. जवळपास 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी ओरोस मुख्यालय, ओरोस, देवगड पोलीस ठाणे येथे सेवा बजावली. सध्या ते जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे कार्यरत होते. विशेषत: कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्हय़ातील वाहतूक सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी पिंटो यांनी मोठी मेहनत घेतली होती. अगदी दोन दिवसांपूर्वी कणकवलीत भाजपतर्फे ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला, तेथेही पिंटो हे डय़ुटीस होते.
त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच सहकारी पोलिसांनी कणकवली येथे धाव घेतली. पिंटो हे मनमिळावू स्वभावामुळे सहकाऱयांमध्ये परिचित होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने सहकाऱयांचेही डोळे पाणावले.