वृत्तसंस्था/ बर्लिन
येथे सुरु असलेल्या पहिल्या ऑनलाइन नेशन्स कप स्पर्धेत तिसऱया दिवशी भारताची निराशा कायम राहिली. पाचव्या फेरीत भारताला रशियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी स्वीकारावी लागली तर सहाव्या फेरीत बलाढय़ अमेरिकेने भारताला 2.5-1.5 असे नमवले. सलग पराभवानंतर भारतीय संघ आता गुणतालिकेत दोन गुणासह पाचव्या स्थानावर आहे. चीनने 11 गुणासह पहिले स्थान कायम राखले आहे.
शुक्रवारी झालेल्या पाचव्या फेरीतील सामन्यात रशियाने भारताला 2-2 असे बरोबरीत रोखले. भारताकडून विश्वनाथन आनंदने एकमेव विजय मिळवला. द्रोणावली हरिका व बी अधिबान यांनी बरोबरी स्वीकारली तर पी हरिकृष्णला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर झालेल्या सहाव्या फेरीतील लढतीत अमेरिकेने भारताला 2.5-1.5 असे नमवले. आनंद व हिकारु नाकामुरा यांच्यातील लढत बरोबरीत संपली. युवा विदीथ गुजरातीने कारुआनाविरुद्ध लढत बरोबरीत संपवली. यानंतर, बी अधिबान पराभूत झाला तर अखेरच्या लढतीत हरिकानेही बरोबरी स्वीकारल्याने भारताला ही लढत गमवावी लागली.