ऑनलाईन प्रक्रिया वेळखाऊ, बसपास प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच करा
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनकडून वितरित करण्यात येत असलेल्या ऑनलाईन बसपास प्रक्रियेचे काम संथगतीने सुरू आहे. ऑनलाईन बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थीच निरूत्साही दिसत आहेत. त्यामुळे बसपास प्रक्रियेला गती येत नसल्याचे दिसत आहे. शिवाय ऑनलाईन बसपास प्रक्रिया त्रासदायक व वेळखाऊ असल्याने विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे.
परिवहनने 6 सप्टेंबरपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र मोजक्मयाच विद्यार्थ्यांनी रितसर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून बसपास मिळविले आहेत. त्यामुळे जुन्या बसपासच्या मुदतीत पुन्हा एकदा म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शाळांच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास अनिवार्य झाला आहे. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी जुन्या बसपासची मुदत संपली आहे. त्यामुळे परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दोन वेळा जुन्या बसपासच्या मुदतीत वाढ केली आहे. ऑनलाईन बसपास प्रक्रियेला प्रारंभ होऊन 10 ते 15 दिवस उलटले तरी देखील अद्याप बसपास विभागात शाळांकडून बसपाससाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वी परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात सुरळीत बसपास उपलब्ध करून दिला जात होता. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करताच बसपास विभागातून तात्काळ बसपास उपलब्ध करून दिला जात होता. मात्र गतवषीपासून बसपासप्रक्रिया पूर्णपणे बदलली असून विद्यार्थ्यांना बसपाससाठी सेवा सिंधू संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ व त्रासदायक असल्याने विद्यार्थ्यांना बसपास हातात मिळायला उशीर होत आहे. नवीन बसपास लवकर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे बसपासप्रकिया पूर्वीप्रमाणे सुरळीत करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.