ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा ऑनलाईन सेवेद्वारे आवश्यक गोष्टी मागवण्याकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन येथे या सेवा देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, ॲमेझॉनचे प्रतिनिधी प्रणव बोराटे, बिग बास्केटचे रुपेश सायल, फ्लिफकार्टचे प्रतिक गावकर, उडान डॉट कॉमचे दिनेश चव्हाण तसेच डॅन्झो, स्विगी, झोमॅटो, झूमकार्ट चे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता ऑनलाईन सेवा देताना जीवनावश्यक वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला यांचाच अंतर्भाव असावा. ज्या संस्थांकडे औषध सेवा पोच करण्याचा परवाना असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी. सेवा देणाऱ्या डिलीव्हरी बॉयना जे पास दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ज्या क्षेत्रासाठी पास असेल त्या क्षेत्राबाहेर सेवा देऊ नयेत. डिलीव्हरीसाठी वाहनांची संख्या मर्यादित ठेवावी. सील केलेला भाग अथवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सेवा देऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.