वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचा 100 मी. अडथळय़ाच्या शर्यतीतील ऑलिम्पिक विजेती धावपटू ब्रिना मॅक्नील उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी एआययूने जाहीर केला. या निर्णयामुळे मॅक्नील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता मावळली.
गेल्या जानेवारीत मॅक्नीलवर औपचारिक निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. विश्व ऍथलेटिक्सच्या उत्तेजक विरोधी नियमावलीचा मॅक्नीलने दोनवेळा भंग केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिस्तपालन लवादाने तिच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदीच्या कालावधीला 15 ऑगस्ट 2020 पासून प्रारंभ झाला आहे. मॅक्नीलला या निर्णयाविरूद्ध क्रीडा लवादाकडे दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. अमेरिकेच्या 29 वर्षीय ब्रिना मॅक्नीलने 2016 ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले होते.