प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य एअरगन शूटिंग स्पर्धेत येथील छत्रपती राजाराम टिंबर मार्केट मधील ऑलिम्पिक टारगेट शुटींग रेंजच्या स्वरा मगदूम, विवेक सावंत, संकेत पाटील या नेमबाजांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित ही स्पर्धा औरंगाबाद, वाशी, पनवेल, नाशिक, नागपूर या पाच ठिकाणी घेण्यात आली. स्वरा मगदूमने 10 मीटर एअर रायफल प्रकारात 400 पैकी 378 गुण मिळवून सब युथ गटात प्रथम क्रमांक व ज्युनिअर गटात द्वितीय पटकावला. याच प्रकारात विवेक सावंतने 400 पैकी 383 गुण मिळवून सिनियर, ज्युनिअर व युथ या तिन्ही गटात द्वितीय क्रमांक पटकावला, संकेत पाटीलने 400 पैकी 382 गुण मिळवून सिनिअर, ज्युनिअर व युथ या तिन्ही गटात तृतीय क्रमांक पटकावला.
ओंकार लोहार, समर्थ रवींद्र पाटील, सोहम आळवेकर, सुहास जगदाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली . त्यांची अहमदाबाद गुजरात येथे होणाऱया अखिल भारतीय जी. व्ही. माळवणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशवंत नेमबाजांना प्रशिक्षक विनय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन तर अकॅडमीचे संचालक सचिन पाटील प्रोत्साहन लाभले.