द.आफ्रिकेवर 19 धावांनी मात, बेथ मुनी सामनावीर, गार्डनर स्पर्धावीर, वुलव्हार्टची एकाकी झुंज वाया
वृत्तसंस्था/ केपटाऊन
सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या बेथ मुनीने नोंदवलेले नाबाद अर्धशतक, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली ऍश्ले गार्डनरची अष्टपैलू कामगिरी आणि अचूक मारा व दर्जेदार क्षेत्ररक्षण यांच्या आधारे ऑस्ट्रेलियन महिला संघाने सहाव्यांदा महिलांचा टी-20 विश्वचषक पटकावताना यजमान दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळविला. एकाकी लढत देणाऱया लॉरा वुलव्हार्टचे शानदार अर्धशतक मात्र वाया गेले.
ऑस्ट्रेलियन महिला संघाने या अंतिम लढतीत निर्धारित 20 षटकांत 6 बाद 156 धावा जमविल्या. त्यात बेथ मुनीच्या नाबाद 74 धावांचा समावेश होता. द.आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल व मारिझेन कॅप यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 6 बाद 137 धावांवर रोखत 19 धावांनी विजय साकारत ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच अचूक मारा व अप्रतिम क्षेत्ररक्षण करीत द.आफ्रिकेला जखडून ठेवले होते. मात्र सलामीवीर लॉरा वुलव्हार्टने एकाकी झुंज देत आपल्या संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. तिच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघही चिंतेत पडला होता. पण मेगन शूटने तिला पायचीत करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. वुलव्हार्टने आक्रमक फटकेबाजी करीत 48 चेंडूतच 5 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा झोडपल्या. पण दुर्दैवाने तिला इतरांककडून साथ मिळाली नाही. क्लो ट्रायॉनसमवेत तिने चौथ्या गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी केली. ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयही निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या पाच षटकांत 46 धावा फटकावल्या होत्या तर द.आफ्रिकेला 39 धावांची भर घालता आली. ट्रायॉनने 23 चेंडूत 25 धावा जमविल्या. मेगन शूट, गार्डनर, डार्सी ब्राऊन, जेस जोनासन यांनी एकेक बळी मिळविले. दोघींजण धावचीत झाल्या. द.आफ्रिका संघ पराभूत झाल्याने स्थानिक प्रेक्षकांचीही निराशा झाली.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/26SPO-15-Beth-Mooney-is-the-first-batter-to-score-two-fifties-in-finals-2-1.jpg)
बेथ मुनीचे नाबाद अर्धशतक
ऑस्ट्रेलियन महिला संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऍलीसा हिली व बेथ मुनी यांनी जलद सुरुवात करून देताना 5 षटकांतच 36 धावांची भर घातली. हिली मारिझेन कॅपच्या गोलंदाजीवर 18 धावा काढून बाद झाल्यानंतर ऍश्ले गार्डनरने तिला चांगली साथ दिली. या दोघींनी दुसऱया गडय़ासाठी 7 षटकांत 46 धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळणाऱया गार्डनरचा डावखुरी स्पिनर क्लो लेस्ली ट्रायॉनच्या गोलंदाजीवर आफ्रिकन कर्णधार सुने लुसने लाँगऑफवर अप्रतिम झेल टिपला. गार्डनरने 21 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 29 धावा फटकावल्या.
दुसऱया बाजूने फलंदाज बाद होत राहिले तरी बेथ मुनीने खराब चेंडूवर फटके लगावत धावफलक सतत हलता राहील याची दक्षता घेतली. ग्रेस हॅरिसने धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. पण 14 व्या षटकात डावखुरी स्पिनर म्लाबाला उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तिचा त्रिफळा उडाला. तिने 9 चेंडूत 10 धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंगही फार वेळ टिकली नाही. ट्रायॉनने बॅकवर्ड स्क्वेअरलेगवर तिचा 11 धावांवर झेल टिपला. यानंतरही एका बाजूने विकेट पडत असताना मुनीने धावांचा ओघ कायम राखला. अखेरच्या टप्प्यात तिने जोरदार फटकेबाजी केली. मात्र द.आफ्रिकन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियावर अखेरच्या टप्प्यात बऱयापैकी लगाम घातल्याने ऑस्ट्रेलियाला फार मोठी मजल मारता आली नाही. त्यांच्या शबनिम इस्माईलने यात मोलाची भूमिका बजावताना 26 धावात 2 बळी मिळविले. तिने शेवटच्या षटकात एलीस पेरी व जॉर्जिया वेअरहॅम यांना सलग दोन चेंडूवर बाद केले. मात्र ताहलिया मॅकग्राने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत तिची हॅट्ट्रिक हुकवली. बेथ मुनी 74 धावांवर नाबाद राहिली. तिने 53 चेंडूत 9 चौकार व एक षटकार मारला. महिलांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सलग दोन अंतिम लढतीत अर्धशतक नोंदवणारी ती पहिली महिला फलंदाज बनली आहे. द.आफ्रिकेच्या ट्रायॉन व मलाबा यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलियन महिला 20 षटकांत 6 बाद 156 ः हिली 18 (20 चेंडूत 3 चौकार), बेथ मुनी नाबाद 74 (53 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), ऍश्ले गार्डनर 29 (21 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), ग्रेस हॅरिस 10 (9 चेंडूत 1 चौकार), मेग लॅनिंग 10 (11 चेंडूत 1 चौकार), एलीस पेरी 7 (5 चेंडूत 1 चौकार), वेअरहॅम 0, मॅकग्रा नाबाद 1, अवांतर 7. गोलंदाजी ः शबनिम इस्माईल 2-26, मारिझेन कॅप 2-35, म्लाबा 1-24, ट्रायॉन 1-15.
दक्षिण आफ्रिका महिला 20 षटकांत 6 बाद 137 ः लॉरा वुलव्हार्ट 61 (48 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), तझमिन ब्रिट्स 10 (17 चेंडूत 1 चौकार), मारिझेन कॅप 11 (11 चेंडूत 2 चौकार), सुने लुस 2, ट्रायॉन 25 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नडिन डी क्लर्क नाबाद 8, ऍनेक बॉश 1, सिनालो जाफ्ता नाबाद 9, अवांतर 10. गोलंदाजी ः शूट 1-23, गार्डनर 1-20, डार्सी ब्राऊन 1-25, जेस जोनासन 1-21.