वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे यांच्यात होणारी वनडे मालिका कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. दोन्ही मंडळांनी परस्पर सामंजस्याने मंगळवारी हा निर्णय घेतला.
तीन सामन्यांची ही वनडे मालिका येत्या ऑगस्टमध्ये खेळविली जाणार होती. पण ऑस्ट्रेलियात कोव्हिड 19 बाधितांच्या संख्येत नव्याने भर पडत आहे. 7500 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून जवळपास 7000 रुग्ण त्यातून बरे झाले आहेत. याशिवाय 104 जण या संसर्गाचे बळी ठरले आहेत. ‘सद्य परिस्थितीसह अनेक घटकांचा गांभीर्याने विचार करून आम्ही ही मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मालिका छोटी असल्याने त्याच्या तयारीसाठी जैवसुरक्षिततेचे उपाय ऑगस्टआधी करावे लागणार होते. तसेच खेळाडू, पंच, अधिकारी, स्वयंसेवक यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत वाटणारी काळजी विचारात घेतल्यानंतर हा निर्णय घेतला,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी अध्यक्ष निक हॉकली यांनी सांगितले.
सर्वांच्या हिताचा विचार केल्यानंतर मालिका लांबणीवर टाकणे हाच योग्य निर्णय असल्याचे आम्हाला वाटले. मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला याचे आम्हाला वाईट वाटते. पण भविष्यात योग्य वेळ व तारखा पाहून ही मालिका आयोजित केली जाईल, असेही हॉकली म्हणाले. झिम्बाब्वेने 2003-04 नंतर ऑस्ट्रेलिया दौरा केलेला नसून 2014 साली हरारेत झालेल्या तिरंगी वनडे मालिकेत झिम्बाब्वेने मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला हरविले होते. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. पण परिस्थितीच अशी आहे की मालिका लांबणीवर टाकण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता,’ असे झिम्बाब्वे क्रिकेटचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक गिव्हमोर माकोनी म्हणाले. आता आम्हाला या मालिकेच्या पुनर्नियोजनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.