वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई
न्यूझीलंडच्या दौऱयावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे पहिल्या वनडे सामन्यात आपल्या विश्वविक्रमी विजयाची नोंद करताना यजमान न्यूझीलंडचा 6 गडय़ांनी पराभव केला. वनडे क्रिकेट प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने सलग 22 सामने जिंकण्याचा नवा विश्वविक्रम त्यांच्या पुरुष संघाने केलेला विक्रमाशी बरोबरी केली आहे.
या पहिल्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 48.5 षटकांत 212 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 38.3 षटकांत 4 बाद 215 धावा जमवित विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियाच्या मेगन स्कूटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात स्कूटने 32 धावांत 4 गडी बाद केंले. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा वनडे क्रिकेटमधील हा सलग 22 वा विजय आहे. त्यांनी हा नवा विश्वविक्रम करताना 2003 साली पाँटींगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने पुरूष विभागात नोंदविलेल्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने अलिकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य राखत सलग विजय मिळविले आहेत.
रविवारच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघातर्फे सलामीच्या डॉनने 134 चेंडूत 8 चौकारांसह 90, कर्णधार सॅथर्टवेटने 50 चेंडूत 3 चौकारांसह 32, केरने 46 चेंडूत 4 चौकारांसह 33 ग्रीनने 1 षटकारांसह 12, हॅलीडेने 1 षटकारांसह 13, रोवेने 20 चेंडूत 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे स्कूटने 4 तर कॅरेने 34 धावांत 3 तसेच गार्डनरने 32 धावांत 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या ऍलिसा हिलीने 68 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 65, हेन्सने 19 चेंडूत 2 चौकारांसह 14, कर्णधार लॅनिंगने 5, मुनीने 13 चेंडूत 1 चौकारांसह 12, पेरीने 79 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 56 तसेच गार्डनरने 41 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 53 धावा जमविल्या. पेरी आणि गार्डनर यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 79 धावांची भागिदारी केली. गार्डनरने विजयी षटकार ठोकून आपल्या संघाला या मालिकेत विजयी सलामी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर, रोवे, अमेलिया केर आणि सॅथर्टवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 45.5 षटकांत सर्वबाद 212 (डॉन 90, सॅथर्टवेट 32, ऍमेलिया केर 33, ग्रीन 12, हॅलीडे 13, रोवे 13, स्कूट 4-32, निकोला केरी 3-34, गार्डनर 1-32), ऑस्ट्रेलिया 38.3 षटकांत 4 बाद 215 (हिली 65, हेन्स 14, लॅनिंग 5, पेरी नाबाद 56, मुनी 12, गार्डनर नाबाद 53, जेस केर, रोवे, ऍमेलीया केर आणि सॅथर्टवेट प्रत्येकी 1 बळी).