- त्याने निर्माण केलाय ऑटोमोबाईल क्षेत्रात दबदबा
- आवड आणि छंदाला दिली अभ्यासाची जोड
- यू-टय़ूबच्या माध्यमातून अर्थाजर्नाचा नवा मार्ग
- इच्छुक ग्राहकांचा तो बनला मार्गदर्शक
- ऑटोमोबाईल कंपन्यांनाही त्याची वाटू लागली गरज
शेखर सामंत/सिंधुदुर्ग:
मळलेल्या वाटेने सर्वजणच जातात, परंतु जे स्वत:ची वेगळी वाट बनवून वाटचाल करतात ते इतिहास घडवतात. ओंकारबद्दल काहीसं असच म्हणावं लागेल. व्हॉटस्ऍप्, फेसबूक, यू-टय़ूबच्या आजच्या या जमान्यात आजची ही युवा पिढी भरकटत चालली असताना ओंकार मात्र याला अपवाद ठरलाय. लहानपणापासून विविध गाडय़ांबद्दल माहिती मिळवण्याच्या आपल्या छंदाला अभ्यासाची जोड देत, ही माहिती यू-टय़ूबच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवत अर्थाजनाबरोबरच त्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात आपल्या नावाचा झेंडा रोवलाय. आज ग्राहकांना कुठलीही नवी गाडी घ्यायची असेल, तर तो निश्चितपणे आंsकारच्या ‘एरिया ऑफ इंट्रेस्ट’ या यू-टय़ूब चॅनेलला भेट देऊन माहिती घेतो. अभ्यास आणि विश्वासाहर्ता हे आंsकारच्या या नव्या चॅनेलचे प्रमुख बलस्थान आहे.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले शहरात आजोळ असलेला ओंकार उर्फ साहील संजीव सुर्वे हा रत्नागिरीला राहातो. वेंगुर्ल्यातील पूर्वाश्रमीच्या संध्या उर्फ निता बोवलेकर यांचा तो मुलगा. रत्नागिरीच्या फिनोलेक्समध्ये त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून त्याने पुढे पुणे येथे कार डिझायनिंग क्षेत्रात नुकतेच आपल्या पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पेशाने इंजिनिअर असलेल्या ओंकारला लहानपणापासून चित्रकला आणि मोबाईलचे वेड. विशिष्ट पद्धतीच्या ऍप्स्चा वापर करीत मोबाईलवर चित्रे काढण्याचा त्याला छंद. हा छंद जोपासण्यासाठी तो शालेय शिक्षण घेत असताना त्याने वडिलांपाशी हट्ट करून त्यांच्याकडून 38 हजार रुपयांचा ‘सॅमसंग नोट 5’ हा महागडा मोबाईल मिळवला व या मोबाईलच्या माध्यमातून त्याने स्वकल्पनेतील विविध गाडय़ांची मॉडेल्स चित्रांच्या माध्यमातून साकारायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे विविध चित्रे काढायला सुरुवात केली. हे सर्व करीत असताना एकदा त्याने सॅमसंगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत चक्क प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल सॅमसंग कंपनीने त्याला त्यांच्या नोट-6 या मोबाईल लाँचिंग प्रोग्रामसाठी खास दिल्ली येथे निमंत्रित केले. त्याच्या प्रवासाकरीता त्याला विमानाचे तिकीट काढून दिले. पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची राहायची व्यवस्थाही केली व नवीन मॉडेलचे लाँचिंगही त्याच्याच हस्ते करत बक्षीस म्हणून 60 हजार रुपये किमतीचा नोट-6 हा मोबाईल त्याला भेट दिला.
‘ओंकार’चे कर्तृत्व एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. त्याने आय. टी., इंजिनिअरींग, फोटोग्राफी आणि पेंटिंमधील आपल्या ज्ञानाची सांगड घालत सोशल मीडियावर ‘एरिया ऑफ इंट्रेस्ट’ या नावाने स्वत:चे यू-टय़ूब चॅनेल सुरू केले. मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीची नवी गाडी आली की तो शोरुममध्ये धाव घ्यायचा व त्या नव्या गाडीची आतून, बाहेरून फोटोग्राफी करून त्याची डिटेल माहिती घ्यायचा. स्वत: मॅकेनिकल इंजिनिअर व कार डिझायनर असल्यामुळे त्याची माहिती अचूक व विश्वासार्ह असायची. ही माहिती व गाडीची छायाचित्रे व व्हीडिओ तो आपल्या चॅनेलवर अपलोड करायचा. अभ्यासपूर्ण माहिती आणि छायाचित्रांमुळे कार खरेदी करू इच्छिणाऱया ग्राहकांना बाजारपेठेतून योग्य गाडी खरेदी करणे सोपे होऊ लागले. त्यामुळे ओंकारचा हा यू-टय़ूब चॅनेल प्रसिद्धीच्या झोतात आला. आता तर या चॅनेलचे सबस्क्रायबर 2 लाख 70 हजाराच्याही पुढे पोहोचले आहेत. यू-टय़ूबनेही त्याला चॅनेलचा मोबदला देण्यास सुरुवात केली. ओंकारला आता या यू-टय़ूबकडून महिन्याला 50 ते 55 हजार रुपयांचे इनकम सुरू झाले आहे.
ओंकारच्या नावाचा दबदबा आता ऑटोमोबाईल क्षेत्रात वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्स कंपनीने ओंकारशी थेट संपर्क साधून सफारी या आपल्या नव्या मॉडेलचा व्हीडिओ बनवून तो त्याच्या चॅनेलवरून प्रसारित करण्याची चक्क ऑफर दिली. यासाठी त्यांनी ओंकारला पुणे येथे बोलावून घेतले. ओsंकार सध्या या टाटा सफारीच्या नव्या मॉडेलची माहिती आणि छायाचित्रे घेण्यासाठी पुणे येथे पोहोचला आहे.
थोडक्यात यू-टय़ूबच्या माध्यमातून आपल्या छंदाला अभ्यासाची जोड देऊन ओंकारने अर्थाजनाची जी नवी वाट शोधून काढली, त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. आज ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्ससारख्या बलाढय़ कंपनीला ओंकारच्या कर्तृत्वाचे महत्व उमजले. भविष्यात ओंकारला केवळ त्याच्या कमेंटस्साठी विदेशी कंपन्यांकडून ऑफर्स आल्या, तर आश्चर्य वाटायला नको. कोकणातल्या एका सामान्य मुलाने दाखवलेल्या या कर्तृत्वाचे व शोधलेल्या नव्या मार्गाचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.