- 17 जूनपर्यंत निर्बंध कायम
ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओडिशा सरकारने आणखी 16 दिवस म्हणजेच 17 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष राहत आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, हे लॉकडाऊन 17 जूनच्या सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 जूनच्या सकाळी 5 वाजल्यापासून ते 17 जूनच्या सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण राज्यात लॉकडाऊन असणार आहेत.
- आठवडाभर सायंकाळी 6 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण निर्बंध
अधिसूचनेत पुढे सांगण्यात आले आहे की, आठवडाभर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णपणे निर्बंध असणार आहेत. तर आठवड्यात शुक्रवार सायंकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ओडिशा सरकारने 5 मे ते 19 मे पर्यंत राज्यव्यापी लॉकडाऊन जारी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 18 मे रोजी सरकारने 1 जूनच्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली होती.
मुख्य सचिव सुरेश चंद्र महापात्रा यांनी सांगितले की, राज्यात कोरोना संसर्गाच्या दरात घट होताना दिसत आहे. तरी देखील आपणासमोर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यातील रेशन दुकाने, फळे, भाजीपाला, दूध आदी दुकाने सुरू असणार आहेत. तसेच रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये पार्सल सेवा सुरू असणार आहे. मात्र, या काळात कोरोनाबाबतच्या नियमावलीची पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.