भुवनेश्वर : 2023 हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुंदरगढ जिल्हय़ातील राऊरकेला येथे लवकरच जागतिक दर्जाचे नवे हॉकी स्टेडियम उभारले जाईल, अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली. 20 हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियमही असणार आहे. जागतिक स्तरावर भारतातील स्टेडियम आदर्शवत असावे, असे आपला प्रयत्न असल्याचे पटनाईक यांनी यावेळी नमूद केले.
राऊरकेलामधील बिजू पटनाईक तांत्रिक विद्यापीठ परिसरातील 15 एकर जागा या प्रस्तावित हॉकी स्टेडियमसाठी निश्चित केली गेली आहे. 2023 मधील पुरुषांची हॉकी विश्वचषक स्पर्धा भुवनेश्वर व राऊरकेला येथे खेळवली जाणार आहे.
सुंदरगढ जिल्हा हा देशातील हॉकी गुणवत्तेचे पॉवरहाऊस ठरत आले आहे आणि जिल्हय़ातील अनेक महान हॉकीपटूंनी भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केले आहे. दिलीप तिर्की व सुनीता लाक्रा हे अव्वल खेळाडू सुंदरगढ जिल्हय़ातील आहेत. अलीकडेच, राज्य सरकारचे उच्चस्तरीय पथक राऊरकेला भेटीवर आले होते. त्यांनी पायाभूत सेवासुविधांची यावेळी पाहणी केली. सुंदरगढ जिल्हय़ात सिंथेटिक हॉकी टर्फच्या 17 ब्लॉक उभारणीला यापूर्वीच सुरुवात केली गेली आहे.