10 रंगांमध्ये खरेदी करता येणार – एका चार्जिंगवर 150 किमी धावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ओला’ कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकांच्या मनात लागून राहिलेली प्रतीक्षा अखेर समाप्त होण्याचे संकेत आहेत. कारण कंपनी येत्या 15 ऑगस्टपर्यंत आपली ई स्कूटर लाँचिंग करण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी स्कूटरच्या लाँचिंगचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
यातील सर्व स्पेसिफिकेशन आणि डिटेल सादर करणार असून याअगोदर सर्व ग्राहकांना ज्यांनी सदरच्या स्कूटरचे बुकिंग केले आहे त्यांचे आभार मानले आहेत. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार ओला ई-स्कूटर विविध रंगसंगतीत उपलब्ध होणार आहे. यामध्ये ब्लॅक, व्हाईट, ग्रे, रेड, ब्लू आणि यामध्ये शेड्सचा यात समावेश आहे. कंपनीने 15 जुलैपासून या स्कूटरचे पूर्व बुकिंग 499 रुपयांमध्ये करण्यास सुरुवात केली होती. बुकिंगची सुरूवात केल्याच्या 24 तासातच 1 लाखापेक्षा अधिकच्या गाडय़ांचे बुकिंग झाले होते.
ई स्कूटरची किमत..
कंपनीकडून आतापर्यंत या ई-स्कूटरच्या किमतीचा खुलासा केलेला नाही. परंतु काही अहवालांमधून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या स्कूटरची किमत 85,000 रुपये राहण्याची शक्यता आहे. कंपनीने अन्य कोणत्याही माहितीचा खुलासा केलेला नाही.