या प्रकल्पासाठी कंपनी 14.9 हजार कोटी रुपये खर्च करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कूटर (ई स्कूटर) मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कंपनी येत्या पाच वर्षामध्ये दुचाकी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करणार असल्याची माहिती आहे.
यासाठी ओला जवळपास 14.9 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याची योजना आखणार असल्याचे संकेत आहेत. कंपनी आपल्या पार्टनर्ससोबत हे काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ओला हायपरचार्जर नेटवर्कच्या मदतीने आपली इलेक्ट्रिक दुचाकी ग्राहकांना सुपर फास्ट चार्जिंग करून देण्याची व्यवस्था करणार आहे. याकरीता लवकरच नवीन नेटवर्क उभारणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
कोठे उभारणार स्टेशन्स
नवीन योजनेनुसार स्टॅण्ड अलोन टॉवर्ससोबत मॉल्स, आयटी पार्क, ऑफिस कॉम्प्लेक्स, कॅफे आणि अन्य प्रसिद्ध ठिकाणांवर सदरची स्टेशन्स उभारली जाणार असल्याचे नमूद केले आहे.
मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक
पत्रकार परिषदेत बोलताना ओलाचे अध्यक्ष आणि सीईओ भावेश अग्रवाल यांनी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिक मोबिलिटीला भविष्य असून आम्ही ग्राहकांना पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांचे मालक बनण्याचा अनुभव मिळवून देणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
400 शहरांमध्ये उभारणार स्टेशन्स
ओलाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी आगामी पाच वर्षांच्या कालावधीत देशातील जवळपास 400 शहरांमध्ये 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. सदर योजनेमध्ये पहिल्या वर्षात 100 शहरांमध्ये 5000 चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर मात्र 18 मिनिटात 50 टक्के चार्जिंग होणार आहेत. इतक्या वेगवान चार्जिंगनंतर स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.