35 कंटेनरची खरेदी : शहरातील प्रत्येक वॉर्डकरिता मिळणार एक वाहन : नागरिकांचा प्रतिसाद आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना अत्याधुनिक यंत्रणेची जोड मिळत आहे. घरोघरी जावून ओल्या आणि सुक्या कचऱयाची उचल करण्यासाठी प्रत्येक वॉर्डकरिता स्वच्छता कर्मचाऱयांना वेगळय़ा मिनी कंटेनरची साथ मिळणार आहे. याकरिता आणखी 35 कंटेनरची खरेदी करण्यात आली आहे.
घरोघरी जावून कचऱयाची उचल केली जाते. पण ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या 16 वॉर्डमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱयांना कचऱयाची उचल करणाऱया 11 वॉर्डकरिता मिनी कंटेनरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एरव्ही लहान चार चाकी वाहनांच्या ड्रममध्ये ओला व सुका कचरा जमा करण्यात येतो. पण आता याकरिता वेगळय़ा वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे. ओला व सुका कचरा भरण्यासाठी मिनी कंटेनरमध्ये दोन विभाग आहेत. यामुळे ओला व सुका कचरा वेगळा करणे सोयीचे ठरणार आहे. प्रत्येक वॉर्डाकरिता एकप्रमाणे आणखी 35 वाहने खरेदी केली आहेत. यामुळे यापुढे प्रत्येक वॉर्डमध्ये वेगळय़ा स्वरुपाची घंटागाडी पाहावयास मिळणार आहे. शहरात सुका व ओला कचरा वेगळा करून देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.