कारखान्यांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत असल्याने कारखाने काही दिवस बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर येत आहे. संसर्ग वाढू नये यासाठी कारखान्यांमध्ये सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
औद्योगिक वसाहती या बेळगावचा आर्थिक कणा आहेत. 7 ते 8 हजार कामगार लहान उद्योगांपासून मोठय़ा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर त्यावर आधारित 2 ते 3 हजार कामगार अवलंबून आहेत. या सर्वांना रोजगार देण्याचे काम बेळगावमधील औद्योगिक वसाहतीमध्ये केले जाते. क्लोजडाऊनमध्ये औद्योगिक क्षेत्राला वगळण्यात आले. यामुळे सर्व उद्योग सुरळीतपणे सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू नसले तरी उद्योग सुरू असल्याने कमी प्रमाणात महसूल मिळत आहे.
परंतु आता या वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. लघु उद्योगांपासून मोठय़ा उद्योगांपर्यंत कामगारांना कोरोना होत आहे. काही दिवसांपूर्वी बेळगावपासून जवळच असणाऱया शिनोळी औद्योगिक वसाहतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ माजली होती. आता बेळगावमध्ये काही कारखान्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडू लागल्याने कामगारांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्ण सापडताच तो कारखाना बंद ठेवला जात असल्याने इतर कारखान्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.