सौदी अरेबियाने मागितले स्वतःचे 2 अब्ज डॉलर्स : चीनसमोर पुन्हा हात पसरण्याची इम्रान खान यांच्यांवर वेळ
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तान सद्यकाळात आर्थिक चणचणीला सामोरा जात आहे. यादरम्यान त्याचा सर्वात मोठा ‘दाता’ सौदी अरेबियाने स्वतःचे 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चीनसमोर नव्या कर्जासाठी हात पसरविण्याच्या तयारीत आहेत. चीनकडून कर्ज घेत पाकिस्तान सौदीला 2 अब्ज डॉलर्सची (318 अब्ज पाकिस्तानी रुपये) परतफेड करू शकते. सद्यस्थितीत पाकिस्तानच्या कर्ज फेड करणाऱया खजिन्यात केवळ 1 अब्ज डॉलर्सची रक्कम शिल्लक राहिली आहे.
काश्मीरसंबंधी पाकिस्तानच्या वर्तनामुळे नाराज सौदी अरेबियाने मे महिन्यातच स्वतःचे वित्तीय समर्थन मागे घेतले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये सौदी अरेबियाने पाकिस्तानला 3 वर्षांसाठी 6.2 अब्ज डॉलर्सचे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली होती. यात 3 अब्ज डॉलर्सचे रोख सहाय्य सामील होते, तर उर्वरित रकमेच्या बदल्यात पाकिस्तानला कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाणार होता.
3.3 टक्के व्याजही भरणार
करारानुसार प्रारंभी सौदी अरेबियाने पाकिस्तानला रोख मदत तसेच तेलाची सुविधा केवळ एक वर्षासाठी दिली होती. परंतु नंतरच्या वर्षांमध्ये हा कालावधी 3 वर्षांसाठी करण्यात आला होता. या 3 अब्ज डॉलर्सच्या रोख सहाय्यासाठी पाकिस्तानला 3.3 टक्क्यांचे व्याजही भरावे लागणार आहे.
चीनकडून कर्जाची उचल
पाकिस्तानने 4 महिन्यांपूर्वीच 1 अब्ज डॉलर्सचे सौदीचे कर्ज फेडले आहे. पाकिस्तानला चीनकडून अशाप्रकारची सुविधा मिळाल्यास तो दोन अब्ज डॉलर्सचे कर्जही परत करण्याच्या स्थितीत असेल. परंतु पाकिस्तानला नवे कर्ज न मिळलयास तो चांगलाच अडचणीत येणार आहे.
जीडीपीच्या 90 टक्के कर्ज
पाकिस्तानचे सार्वजनिक कर्ज जून महिन्यापर्यंत वाढून 37,500 अब्ज पाकिस्तानी रुपये किंवा जीडीपीच्या 90 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पाकिस्तान यंदा कर्ज फेडण्यासाठीच 2,800 अब्ज रुपये खर्च करणार आहे. अनुमानित करसंग्रहाच्या तुलनेत हे प्रमाण 72 टक्के इतके आहे.