प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणाऱया तीन पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
सिध्दार्थ रमेश चौगुले (वय 28, मुळचा रा. कंग्राळ गल्ली, सध्या रा. माळमारुता) असे जखमी तरुणाचे नाव असून 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ही घटना घडली आहे. मारहाणीत तरुणाचा हाताला दुखापत झाल्याचे समजते.
खडेबाजार पोलीस स्थानकातील हवालदार महांतेश हणगंडी, अंब्रीश बेल्लीहाळ, बसाप्पा बागाणी या तिघा जणांनी सिध्दार्थला मारहाण केली आहे. काही तरुण भांडत होते. त्यावेळी सिध्दार्थ कॉलेज रोडवरील एका कॅन्टीनमध्ये चहा पित होता. कॅन्टीनमधून बाहेर काढुन त्याला मारहाण करण्यात आली आहे.
संबंधितांवर कारवाई झाली नाही तर 26 जानेवारी रोजी होणाऱया प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्यावेळी निदर्शने करण्यात येईल, असा इशाराही दलित संघटनांनी दिला आहे. जखमी तरुणावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.