वर्षाकाठी खर्च होणार रु. 63 कोटी : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरित
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सुमारे 1185 कंत्राटी कामगारांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लेबर सप्लाय सोसायटीत समाविष्ट करून घेण्यात आले असून त्यांच्यावर वर्षाला रु. 63 कोटी खर्च होणार आहेत. गेले 10 ते 12 वर्षे ते कामगार कंत्राटदारांच्या अंतर्गत काम करीत होते. सोसायटीत समावून घ्यावे, अशी त्यांची मागणी होती. ती पूर्ण झाली असून त्या सर्वाना दिलासा मिळला आहे.
पर्वरी येथील सचिवालयात काल सोमवारी यासाठी एक कार्यक्रम करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीजणांना प्रातिनिधीक स्वरूपात सोसायटीत समाविष्ठ करण्यात आल्याची पत्रे वितरित केली. खात्याचे मंत्री दीपक पावसकर व इतर त्यावेळी उपस्थित होते.
कामगारांनी सेवेत खंड पडू देऊ नये
कंत्राटी कामगारांनी अनेक वर्षे सेवा दिलेली आहे. अनेकदा त्यांना महिनेच्या महिने पगारही मिळत नव्हता. तरीही ते जनतेला सेवा देतात हे कौतुकास्पद आहे. ते कामगार खरेखुरे जनतेचे सेवक आहेत. गेली अनेक वर्षे कंत्राटी सेवेत काम करून त्यांनी सरकारचे सुमारे रु. 7 कोटी वाचवले आहेत. कोरोनाचे सावट असतानाही सरकारने त्या कंत्राटी कामगारांना लेबर सप्लाय सोसायटीत समावून घेतले. हा निर्णय त्यांच्या भल्यासाठीच घेण्यात आला असून त्यांनी जनतेची सेवा चालूच ठेवावी, त्यात खंड पडू देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ ते कामगार कंत्राटी सेवेत होते. त्यात अनेक महिलांचा तसेच अभियंत्याचाही समावेश आहे. प्रत्येकाने कंत्राटदार होण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी त्यांनी यापुढेही चांगले काम करून जनतेला चांगली सेवा द्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
… तर 40 ही मतदारसंघांमध्ये कोविड सेंटर
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
कोविड केअर सेंटर प्रकरणी कोणी वृथा राजकारण करू नये. आपणा सर्वांना कोरोना आजाराशी लढायचे आहे. कोविड रुग्णांशी नव्हे, असे सांगून गरज पडली तर 40 मतदारसंघात प्रत्येकी एक कोविड सेंटर स्थापन करण्याचा इरादाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केला.
ते म्हणाले की कोविड केअर सेंटर हे कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना बरे करण्यासाठी आहे. गोमंतकीयांसाठीच ती सेंटर असून विरोधी पक्ष त्यांचे आमदार, पदाधिकरी त्या सेंटरना कशासाठी विरोध करतात? असा सवाल डॉ. सावंत यांनी उपस्थित केला आहे.
कोविड केअर सेंटरला कोणी विरोध करू नये कारण ती एक सेवा आणि सुविधा आहे. त्याचा लाभ गोमंतकीय जनतेलाच होणार असून त्या सेंटरना विरोध करणे चुकीचे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अशी सेंटर आता आवश्यक असून ती गोव्यात विविध ठिकाणी करावीच लागतील. त्याला उपाय नाही, असे डॉ. सांवत यांनी नमूद केले.
कोरोनाबाधितांकडे सहानुभूतीने पहावे
कोरोना रुग्णांची सेवा करताना अनेक आरोग्य कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांचे प्रती सहानूभूती बाळगावी. त्यांचा आदर करावा कारण सेवा बजावताना ते बाधित झाले आहेत. याचा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे. कोरोना बाधित झाले म्हणून त्यांच्यापासून दूर राहू नये. माणुसकीने त्यांच्याकडे पहावे असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.
कोविड रुग्णांची एकाच ठिकाणी सोय करणे शक्य नाही. तेथे मर्यादा येतात, रुग्णांची संख्या जशी वाढते तशी केअर सेंटर वाढवावी लागतील. पॉझिटिव्ह रुग्ण चालतात मग कोविड सेंटर का नको? कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी नमूद केले.