हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’ या वनलाईनवर आधारलेला एक नवा कोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट 19व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) निवडला गेला आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देश-विदेशातील सिनेमाहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत निर्माते लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद यांनी सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करत ‘कंदील’ चित्रपटाची घोषणा केली आहे. आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणाऱया स्लममधील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी असून, पाच तरुण दिसतात. एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरुण बसलेले आहेत, चौथा तरुण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्यावर नजर रोखून उभा आहे. ‘श्रीमंत… श्रीमंत…’ या गाण्याच्या (मुखडय़ाची) पार्श्वसंगीताची संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजन शैलीत भाष्य करणारं कथानक पहायला मिळणार याची जाणीव होते.
‘कंदील’चं दिग्दर्शन करणाऱया महेश कंद याचा इथवरचा प्रवास खूप संघर्षमय आहे. महेशने कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये ऑफिशियल शिक्षण घेतलेले नाही. फिल्म फेस्टिव्हल, फिल्म क्लबमध्ये जाऊन सिनेमाचे तंत्र स्वतः आत्मसात केले आहे. महेशने यापूर्वा चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप काम केलं आहे. ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी सिनेमासाठी दिग्दर्शक मिलिंद उके यांना असिस्ट केलं आहे. बरीच वर्षे लेखक अमरजीत आमले यांच्या सान्नध्यात राहून महेशनं सिनेमाचे धडे गिरवले आहेत. यासाठी तीन वर्ष स्लममध्ये जाऊन रिसर्च केला. विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा आधी मोबाईलमध्ये चित्रीत करून पाहिला आणि नंतरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात केली.