स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव : जिल्हा प्रभारी सचिव अतिक यांची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कचऱयापासून गॅस व वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. पण सर्व प्रस्ताव बासनात गेले आहेत. मात्र, आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा प्रस्ताव राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रस्तावाबाबतचे सादरीकरण स्मार्ट सिटी कंपनीने बुधवारी जिल्हा प्रभारी सचिव अतिक यांच्या बैठकीत सादर केले. हा प्रस्ताव राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहकार्य करावे, अशी सूचना जिल्हा प्रभारी सचिव अतिक यांनी मनपाच्या अधिकाऱयांना केली.
महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कामाचा आढावा जिल्हा प्रभारी सचिव अतिक यांनी घेतला. स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्वच्छता आणि कचऱयाच्या विघटनाची माहिती त्यांनी घेतली. स्वच्छतेकरिता महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतात, याचा आढावा घेतला. स्वच्छता आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत याची माहिती अतिक यांनी जाणून घेतली.
शहरात दररोज अडीचशे टन कचरा जमा होतो. सध्या ओला आणि सुका कचरा विघटन करून देण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल आणि भाजी मार्केटमधील कचऱयापासून गॅसनिर्मिती व वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने तयार केला आहे. सदर प्रस्तावाचे सादरीकरण बैठकीवेळी करण्यात आले. स्मार्ट सिटीकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेकडून कचऱयाचे विघटन करून कचरा देण्याची गरज आहे. त्यामुळे प्रस्ताव राबविण्यासाठी महापालिकेचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनपा पर्यावरण साहाय्यक अधिकाऱयांकडून माहिती घेण्यात आली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रस्ताव राबविण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना मनपा अधिकाऱयांना अतिक यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकाऱयांनी तुरमुरी डेपोची पाहणी करून स्वच्छतेचे काम कोणत्या पद्धतीने करण्यात येते, याचा आढावा घेतला.