छोटय़ा व्यावसायिकांना 5 हजार रूपये मानधन द्या; कराड पालिकेच्या विशेष सभेने केला ठराव
प्रतिनिधी/ कराड
राज्यातील मिनी लॉकडाऊनला सर्व स्तरातून व्यापाऱयांचा विरोध होत असताना कराड नगरपालिकेच्या विशेष सभेने, कडक निर्बंध ठेवून व्यापाऱयांना दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीचा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच रोजगार बंद असल्याने हातावरचे पोट असणाऱया छोटय़ा व्यावसायिकांना 5 हजार रूपये मानधन द्यावे, अशी मागणीही केली. याबाबतचे ठराव मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱयांना पाठवण्यात येणार आहेत. विकासकामांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली विशेष सभा रद्द करून कोरोनाच्या उपाययोजनांची विशेष सभा आयोजित करत नगरसेवकांनी राज्यात सर्वप्रथम या मागण्यांचे ठराव केले आहेत. ऑनर्लाइन झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या होत्या.
सुमारे 40 विषयांवर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी यास विरोध करत कोरोना उपाययोजनांवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पहिली सभा रद्द करून कोरोना उपाययोजनांवर विशेष सभा घेण्यात आली.
या सभेत जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी, मिनी लॉकडाऊनमुळे व्यापाऱयांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने निर्बंध कडक करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी तसेच हातावरचे पोट असणारांना 5 हजार रूपये मानधन द्यावे, या मागणीचा ठराव मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. या विषयावर चर्चा करताना आरोग्य सभापती विजय वाटेगावकर म्हणाले की, शहरात संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्र वाढवणे, टेस्टिंग केंद्र वाढवणे, सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन नागरिकांना लस घेण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुकान बंदचे निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱयांवर अन्याय होत आहे. निर्बंध कडक घातले तरी चालतील मात्र दुकाने सुरू होणे गरजेचे आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान म्हणाल्या, लसीकरण केंद्र वाढवणे व त्याठिकाणी सोयी सुविधा करणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केल्यानंतर रूग्णास रिऍक्शन आल्यास उपजिल्हा रूग्णालयामध्ये बेड राखीव ठेवावेत.
गटनेते राजेंद्रसिंह यादव म्हणाले, लस सुरक्षित रहावी, यासाठी डीप फ्रीजरची गरज असून आवश्यकतेनुसार हे फ्रीज विकत घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेकडून आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी बीएएमस, बीएसएमएस डॉक्टर्स यासाठी पुढाकार घेतील. या डॉक्टर्सना आवाहन करण्याची सूचना केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके म्हणाले, लसीकरण व टेस्टिंग सेंटरसाठी डॉक्टर्स व नर्सची कमतरता आहे. यासाठी मानधन देवून वैद्यकीय स्टाफ नेमणे आवश्यक आहे. वॉर्डनिहाय लसीकरण कार्यक्रम राबवावा लागणार आहे. नगरसेवकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे. आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येईल, असे ते म्हणाले. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, हणमंतराव पवार, फारूक पटवेकर, विनायक पावसकर, सुहास जगताप आदी नगरसेवकांनी