आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रयत्नाला यश
सांगरुळ / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा कनिष्ठ महाविद्यालयातील अघोषित शाळेतील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर आज मार्गी लागला. आमदार जयंत आसगावकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले.
मागील अधिवेशनाच्यावेळी कोल्हापूर व मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांना काही शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या कारभारामुळे यादी प्रलंबित राहिली होती. त्यांना निधी उपलब्ध झाला नव्हता, परंतु आज सभागृहामध्ये सदर महाविद्यालयमधील शिक्षकांना निधी उपलब्ध झाल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार आसगावकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.
या निर्णयानंतर आमदार आसगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले. तसेच शालेय शिक्षणामध्ये असणारे विविध प्रलंबित प्रश्न जुनी पेन्शन योजना, २०१२ नंतर असणारी शिक्षक भरती बंदी, संच मान्यता प्रचलित अनुदान टप्पा हे सर्व विषय सोडविण्यासाठीचेआश्वासन सर्वांनी यावेळी दिले.
यावेळी खंडेराव जगदाळे, संजय डावरे, बिभीषण रोडगे, वैजनाथ चाटे, रविंद्र तम्मेवार, वि. ह. सपाटे, बंटी मईंग, नारायण खैरे, सावंता माळी, शिवाजी पारळे, रत्नाकर माळी, भारत शिरगावकर, जयसिंग जाधव, चंद्रकांत बागणे, रावसाहेब पानारी आदी उपस्थित होते.