‘घरगुती’चे दर स्थिर : नववर्षाच्या प्रारंभी व्यावसायिकांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल (व्यावसायिक) सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्याने छोटय़ा व्यावसायिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरच्या दरात 102.50 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय शनिवारी सकाळी जाहीर केला. एकीकडे कमर्शियल सिलिंडर स्वस्त झाले असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात न केल्याने गृहिणींवरील आर्थिक ताण मात्र कायम राहणार आहे. सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शहरातील गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती जाणून घेता येणार आहेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे मागील काही महिने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात येत होती. मात्र, शनिवारी इंडियन ऑईलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, 10 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 102.50 रुपयांची कपात करण्यात आली. सध्या मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलिंडरचा भाव 1948.50 इतका आहे. याशिवाय दिल्लीत 1998.50 रुपये, चेन्नईत 2131 रुपये आणि कोलकात्यात 2076 रुपये दर असणार आहे. दरम्यान, सलग तिसऱया महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई आणि दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरचा दर 900 रुपयांच्या आसपास आहे. तसेच कोलकात्यात 926 रुपये तर चेन्नईत 916 रुपये इतका आहे.