25 मतदारसंघांकरता आघाडीची शक्यता
वृत्तसंस्था/ चेन्नई
बिहार निवडणुकीत 5 जागांवरील विजयाने आत्मविश्वास दुणावलेले असदुद्दीन ओवैसी आता पुढील वर्षी होणाऱया विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसू लागले आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीत एआयएमआयएमचे उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. तर आता तामिळनाडूतही निवडणूक लढविण्याची योजना ओवैसी आखू लागले आहेत. याचबरोबर कमल हासन यांच्या पक्षासोबत आघाडी करण्यासंबंधी ओवैसी यांची चर्चाही सुरू आहे. दोन्ही पक्षांदरम्यान जागावाटपही निश्चित झाल्याचे समजते.
ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) हा पक्ष कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) सोबत हातमिळवणी करणार आहे. एआयएमआयएम आणि एमएनएम मिळून 25 जागांवर निवडणूक लढू शकतात.
ओवैसी यांची बैठक
ओवैसी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसंबंधी राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱयांसोबत सोमवारी बैठक घेतली आहे. त्रिची आणि चेन्नईत पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कमल हासन यांनी आगामी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याची घोषणा पुढील काळात करणार असल्याचे हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
सर्वेक्षणाच्या आधारावर निवड
तामिळनाडूच्या कुठल्या मतदारसंघात उमेदवार उभे करावेत यासंबंधी सर्वेक्षण होत असून त्याच आधारावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष वकील अहमद यांनी दिली आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसोबतच केरळ, आसाम आणि पुडुचेरीत विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच ठिकाणी पक्ष उमेदवार उभा करेल.
मुस्लीम मतपेटी
मुस्लिमांमध्ये विशेष प्रभाव असणाऱया सर्व पक्षांना सोबत आणून निवडणूक लढविण्याचा ओवैसी यांचा प्रयत्न आहे. एआयएमआयएम कमल हासन यांचा पक्ष नाम तमिलर आणि अन्य छोटय़ा पक्षांसोबत आघाडी करू शकतो. 2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडूत 5.86 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर, रानीपेट, तिरुपत्तूर, कृष्णागिरि, रमननाथपुरम, पुडुकोट्टई, त्रिची, मदुराई आणि तिरुनेलवेलीमध्ये मुस्लीमबहुल भाग आहेत. ओवैसी यांचा पक्ष याच मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे.