आगामी युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी फ्रान्सच्या 26 सदस्यीय संघात समावेश
पॅरिस / वृत्तसंस्था
फ्रान्सने आगामी युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी करीम बेन्झेमाला 6 वर्षांनंतर पुनरागमनाची संधी दिली आहे. क्लब स्तरावर रियल माद्रिदचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बेन्झेमासह 26 खेळाडूंची घोषणा बुधवारी केली गेली. डिडीएर डेशचॅम्प्स यांनी या निवडीची माहिती दिली.
2007 मध्ये पुनरागमन केल्यानंतर बेन्झेमा फ्रान्ससाठी नेहमीच महत्त्वाचा खेळाडू ठरत आला. मात्र, मॅथ्यू वॅल्ब्युएना टेप स्कँडलमध्ये त्याचे नाव गोवले गेले व त्यानंतर तो राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर फेकला गेला. आता पुन्हा एकदा संघाने युरो स्पर्धेसाठी त्याच्यावर विश्वास दाखवला असून त्याच्यासह किलियन एम्बापे व ऍन्टोईन ग्रिएझमन यांनाही संधी दिली आहे.
डेशचॅम्प्स काय म्हणाले?
2018 मध्ये रशियातील स्पर्धेत देशाला खेळाडू या नात्याने विश्वचषक मिळवून देणारे डेशचॅम्प्स यांनी बेन्झेमाच्या समावेशामुळे आपला संघ अधिक बळकट होईल, असा ठाम आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. चेल्सी स्टार ऑलिव्हिएर गिरोडऐवजी बेन्झेमाला संधी देण्याबाबत आपण प्रारंभी अनुकूल नव्हतो, याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.
‘खेळाडूंमध्ये नेहमीच निकोप स्पर्धा असावी लागते. गिरोड व बेन्झेमा 3 वर्षापेक्षा अधिक काळ एकत्र होते. आताचा निर्णय देखील प्रेंच संघाच्या हितासाठीच आहे. फ्रान्सचा संघ बेन्झेमासह उतरताना उत्तम खेळ साकारेल. पण, ते ऑलिव्हिएर गिरोडला वगळले म्हणून नव्हे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. अलीकडील सर्व वर्षात फ्रान्सने उत्तमच खेळ साकारला आहे. युरोपमध्ये उपजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिप, हे सारे त्याचे प्रतीक आहे.
बेन्झेमाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
33 वर्षीय करीम बेन्झेमाने 2007 साली आपल्या टीनेजमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि तो लवकरच संघाचा नियमित खेळाडूही बनला. 2016 मध्ये उतरणीचा प्रवास सुरु होण्यापूर्वी त्याने 81 सामन्यात संघाचे प्रतिनिधीत्व केले व 21 वेळा गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. युरो 2008 व 2012 तसेच 2014 विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
क्लब स्तरावर माद्रिद संघातर्फेही त्याने उत्तम खेळ साकारला. मात्र, काही वादंग त्याच्यावर उलटले. पुढे 2018 विश्वचषक संघातूनही त्याची हकालपट्टी झाली. फ्रान्स संघातून वगळले गेले असल्याने 2019 मध्ये त्याने विदेशी राष्ट्राकडून खेळण्यासाठी नवी मोहीम सुरु केली. नंतर ती त्याने मध्येच सोडून देखील दिली. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त आहोत, हे मात्र तो सातत्याने सांगत राहिला.
जागतिक स्तरावरील सर्वोत्तम स्ट्रायकर्सपैकी एक गणल्या गेलेल्या बेन्झेमाने रियल माद्रिदतर्फे मागील 3 हंगामात 20 गोल केले आणि कारकिर्दीतील एकूण 558 सामन्यातील गोलसंख्या 278 वर नेली. बेन्झेमाने आजवर ला लिगा 3 वेळा, चॅम्पियन्स लीग 4 वेळा, कोपाज डेल रे दोनवेळा व क्लब वर्ल्डकप 4 वेळा जिंकून देण्याचा पराक्रम साकारला आहे. त्याच्या खात्यावर आतापर्यंत 18 चषके नोंद आहेत.
युरो चषकासाठी फ्रान्स संघ
गोलकीपर्स ः हय़ुगो लोरिस, स्टीव्ह मॅनडॅन्दा, माईक मेग्नन. डिफेंडर्स ः लिओ डय़ुबोईस, बेंजामिन पॅवर्ड, कर्ट, ज्युलेस, राफेल व्हॅरने, क्लेमेन्ट लेंग्लेट, प्रिस्नेल किम्पम्बे, ल्युकास डिग्ने, ल्युकास हर्नांडेझ. मिडफिल्डर्स ः एन्जिलो कॅन्टे, पॉल पोग्बा, ऍद्रियन रॅबिओट, कॉरेन्टिन टॉलिसो, मॉसा सिसोको. स्ट्रायकर्स ः करीम बेन्झेमा, ऑलिव्हिएर गिरोड, किलियन एम्बापे, मार्कस थुरम, किंग्स्ले कोमन, विस्सॅम बेन येदेर, ऍन्टोईन ग्रिएझमन, थॉमस लेमेर, ओस्मने डेम्बले.
दुखापतग्रस्त ग्रॅन्क्विस्टचा स्वीडिश संघात समावेश
स्टॉकहोम ः हंगामातील सेकंड डीव्हिजनमध्ये केवळ एकच सामना खेळलेल्या आंद्रेयास ग्रॅन्क्विस्टचा दुखापतीनंतरही स्वीडन संघात समावेश केला गेला आहे. 36 वर्षीय ग्रॅन्क्विस्ट सेंटर बॅक पोझिशनवर खेळतो. 2018 विश्वचषक स्पर्धेत त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.
‘जर फक्त 23 खेळाडू निवडायचे असते तर मी ग्रॅन्क्विस्टचा समावेश केला नसता. पण, आता 3 जादा खेळाडू घेण्याची मुभा असल्याने राखीव म्हणून मी त्याला संघात समाविष्ट केले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत त्याला कदाचित संधी मिळणार नाही. पण, बबल लाईफमध्ये तो कालानुरुप योगदान देऊ शकेल’, असे स्वीडनचे प्रशिक्षक जॅन्ने अँडरसन यांनी नमूद केले.
या हंगामात ग्रॅन्क्विस्टला सातत्याने दुखापतीने हैराण केले आणि यामुळे हेल्सिंगबर्ग या क्लबतर्फे तो केवळ चारच सामने खेळू शकला. यात 90 मिनिटे तर तो एकाच सामन्यात खेळला. झॅल्टन इब्राहिमोव्हिक दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, हे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. त्याच्याऐवजी स्पार्तक मॉस्को स्ट्रायकर जॉर्डन लार्सनचा संघात समावेश केला गेला. युरो स्पर्धेसाठी स्वीडनचा अ गटात स्पेन, पोलंड व स्लोव्हाकिया यांच्यासह समावेश आहे.
स्विडीश संघ
गोलकीपर्स– रॉबिन ओल्सेन, कार्ल-जोहान जॉन्सन, क्रिस्तोफर नॉर्डफेल्ट.
डिफेंडर्स ः ल्युडविग ऑगस्टिसन, आंद्रियास ग्रॅन्क्विस्ट, व्हिक्टर लिंडेलोफ, फिलीप हेलँडर, इमिल क्राफ्थ, मिकाएल लस्टीग, पॉन्टस जॉन्सन, मार्कस डॅनिल्सन, मार्टिन ओल्सन. मिडफिल्डर्स ः जेन्स कॅजुस्ते, गुस्ताव स्वेन्सन, व्हिक्टर क्लासेन, ऍल्बिन ईकदल, इमिल फोर्सबर्ग, देजा कुलूसेव्स्की, सेबॅस्तियन लार्सन, क्रिस्तोफर ओल्सन, केन सेमा, मॅतियास स्वॅनबर्ग. स्ट्रायकर्स ः मार्कस बर्ग, जॉर्डन लार्सन, रॉबिन क्वेसन, अलेक्झांडर इसाक.
युफाने युरोची तिकीटे रद्द केल्याने फुटबॉल चाहते नाराज
लंडन- कोव्हिड रिस्ट्रीक्शन्सचे कारण देत युफाने युरो स्पर्धेची तिकिटे रद्द केले असल्याचे ईमेल काही चाहत्यांना पाठवण्यास सुरुवात केली असून यामुळे असे चाहते साहजिकच नाराज होत आले आहेत.
स्टेडियममध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने मर्यादित तिकिटे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे, उपलब्ध तिकिटांचे प्रमाण मुळातच कमी आहे. मात्र, तुलनेने कमी किंमतीची तिकिटे रद्द करत युफाने महागडे हॉस्पिटॅलिटी पॅकेजिस उपलब्ध ठेवल्याने चाहत्यांच्या संतापात आणखी भर पडली आहे. तूर्तास, काही स्टेडियममध्ये 25 टक्के तर काही स्टेडियममध्ये 50 टक्के चाहत्यांना प्रवेश असेल, असे संकेत आहेत.