तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जवळ नाकाबंदीच्या ठिकाणी थांबण्याचा इशारा करूनही न थांबता एका वाहनचालकाने वाहन पोलिसाच्या अंगावर घातले. यात गंभीर जखमी होऊन पोलिसाचा मृत्यू झाला. रामेश्वर गंगाधर परचंडे असे मृत पोलिसाचे नाव आहे. आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांत असलेले पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर परचंडे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंद्रुप पोलिस ठाण्याच्या अंतर्गत वडकबाळ नाकाबंदी पॉईंटवर कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत ते कर्तव्यावर होते. यावेळी एक बोलेरो पिकअप वेगात येत होती. परचंडे यांनी चालकाला थांबण्याची सूचना केली. मात्र, चालकाने गाडी थेट अंगावर घातली. यामध्ये परचंडे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.