प्रतिनिधी / बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी बोलून दाखवली आहे. आता लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच मंगळवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दोन दिवस टप्प्याटप्प्याने ही चर्चा चालणार आहे. या चर्चेपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी त्यांची मागणी बोलून दाखवली आहे. लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळावी, अशी मागणी करणार असल्याचं ते म्हणाले. लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नसून आता वीकेंडला केलं जाणारं लॉकडाऊनही लागू केलं जाणार नसल्याचं ते म्हणाले.कर्नाटकात इतर राज्यातून आलेले रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. या लोकांसाठी कॉरेंटाईन नियम संपवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना ७ दिवस संस्थात्मक कॉरेंटाईन आणि ७ दिवस होम कॉरेंटाईन केलं जाईल. दिल्ली आणि तामिळनाडूहून आलेल्या लोकांची वेगळी व्यवस्था केली जाईल, अशी माहिती येडियुरप्पा यांनी दिली.बंगळुरू हे आयटी हब आहे आणि महाराष्ट्रातील अनेक इंजिनीअर बंगळुरूत काम करतात. त्यामुळे ७ दिवस संस्थात्मक कॉरेंटाईनच्या नियमामुळे कामावर हजर होण्यासाठी बंगळुरुला जाणाऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. विविध राज्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना वेगळं राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण कर्नाटकात महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी संस्थात्मक कॉरेंटाईन सक्तीचं करण्याचा विचार येडियुरप्पा यांचा आहे.