बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोविड -१९ च्या दुसर्या लहरीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान १ एप्रिल ते १३ मे दरम्यान कर्नाटकातील ४१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तर ४१ मृत पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १३ जण एकट्या बेंगळूर मधील आहेत.
पहिल्या लहरीमध्ये १०३ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तर ९,६०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आतापर्यंतच्या दुसर्या लाटेत ४,२०३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. ती महिला सात महिन्यांची गरोदर होती. याविषयी दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,२८ वर्षीय शमीली कोरोनामुळे कोलारच्या आरएम जलप्पा रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान तिचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.