दोन्ही राज्यांच्या प्रवाशांना दिलासा : दोन्ही राज्यांच्या विविध शहरात धावणार बसेस
बेळगाव / प्रतिनिधी
साधारण गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. राज्यात आंतरराज्य सेवेला यापूर्वी प्रारंभ झाला आहे. मात्र, कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा लांबणीवर पडली होती. अखेर दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी चर्चा करून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांबरोबर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव आगारातून सकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्रात बसेस धावणार आहेत.
राज्यात कोरोना व लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली बससेवा सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या इतर शेजारील राज्यांच्या बससेवेला परवानगी मिळाली होती. मात्र, कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा अद्याप सुरू झाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्राला लागून असल्याने बेळगाव विभागाला अधिक फटका बसला होता. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र असा दररोजचा प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
परिवहन मंडळाच्या विविध आगारांतून महाराष्ट्राच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, मिरज, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, औरंगाबाद, बार्शी आदी शहरांकडे धावणार आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेसदेखील कर्नाटकाच्या विविध शहरांकडे धाव घेणार आहेत. बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, गोकाक बस आगार आंतरराज्य बससेवेसाठी सज्ज झाली आहेत.
राज्यात जिल्हय़ांतर्गत व आंतरराज्य बससेवा सुरू झाली. मात्र, बेळगाव विभागाला अधिक उत्पन्न मिळवून देणारी कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद होती. याचा परिणाम बेळगाव विभागाच्या उत्पन्नावर झाला होता. आता दोन्ही राज्यांच्या बससेवेला हिरवा कंदील मिळाल्याने बेळगाव विभागाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
बेळगाव आगारातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनआधी महाराष्ट्रात 350 हून अधिक बसगाडय़ा धावत होत्या. या बसेसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंदचा अधिक फटका बेळगाव विभागाला बसला आहे. मात्र, आता दोन्ही राज्यांनी बससेवेला संमती दर्शविल्याने दोन्ही राज्यांमध्ये बसेस धावताना दिसणार आहेत. मात्र, प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क व सामाजिक आंतर ठेवूनच प्रवास करावा लागणार आहे.