बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी २२,७५८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच ३८,२२४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर राज्यात विविध जिल्ह्यातील ५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण २६,३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. पूर्ण लॉकडाऊननंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ६,२४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १३,२१० रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यत ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत एकूण १,०७,६७५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. राज्यात मंगळवारी सकारात्मकता दर २१.१३ टक्क्यांवर आला होता, तर मृत्यु दर (सीएफआर) २.५८ टक्के होता.