बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शुक्रवारीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट कायम राहिली. तसेच राज्यात सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली. राज्यातून पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती.
शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ५,३५६ नवीन रुग्ण सापडले. नेहमीप्रमाणे बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले. बेंगळूर जिल्ह्यात शुक्रवारी २,६८८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८७४९ होती. शुक्रवारी राज्यात एकूण ५१ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी २१ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे १०८२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची एकूण सक्रिय संख्या ८९,४८३ आहे. यापैकी ५६,७६३ रुग्ण बेंगळूरमधील आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात ४,३३५ रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,६८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.