बेंगळूर/प्रतिनिधी
ईशान्य कर्नाटक शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कोरोना संक्रमित व्यक्तीला शेवटच्या एका तासामध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोरोना बाधित व्यक्तींना मतदानाच्या शेवटच्या एका तासामध्ये मतदानाची संधी दिली जाईल.निवडणुकीशी संबंधित पीआरओ, एपीआरओ आणि पीओसाठी द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम शहरातील बीडीएए फुटबॉल सभागृहात पार पडला.
जिल्ह्यात अतिरिक्त मतदान केंद्रासह एकूण २८ मतदान केंद्रे सुरू केली जातील. बळ्ळारी जिल्ह्यात एकूण ६ हजार ७५३ मतदार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या शेवटच्या एका तासादरम्यान कोरोना बाधित व्यक्तींना मत देण्याची संधी दिली जाईल. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी असणाऱ्या कर्मचार्यांनी पीपीई किट्स (वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे) सोबत ठेवण्याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन कारण्याबात डेमो देताना ही माहिती दिली. यावेळी सर्व बूथ अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी पी.एस. मंजुनाथ, सहायक आयुक्त रमेश यांनी कोरोनाच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार यू. नागराज यांच्यासह जिल्हा निवडणूक कार्यालय निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.