बेंगळूर/प्रतिनिधी
दुबईमध्ये सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीचा खेळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. चिक्कबळ्ळापूर विभागातील एका प्रमुख कॉन्स्टेबलला स्वत: सट्टेबाजी रॅकेट चालवताना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख चिक्कबळ्ळापूर येथील जिल्हा गुन्हे शाखेत कार्यरत असणारा हेड कॉन्स्टेबल अशी झाली आहे. पोलीस अशा प्रकारच्या कृत्यांवर संशयित आरोपींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी लक्षपूर्वक काम करीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्याला दहा दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते आणि तो पोलिसांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. आरोपीला आता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिक्कबळ्ळापूरचे पोलीस अधीक्षक जी.के. मिथुन कुमार यांनी एका वेबसाईटशी बोलताना ही महिती दिली.