ऑनलाईन टीम / पुणे :
वीज ही अत्यावश्यक सेवेत असल्याने कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्याची महावितरणची जबाबदारी आहे. मात्र कोरोनाच्या या खडतर काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावताना नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे तसेच कोविड प्रतिबंधक लस ताबडतोब घ्यावी असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणमधील 14 कर्मचारी संघटनांच्या सुमारे 145 पदाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी (दि. 16) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून पुणे प्रादेशिक विभागात 869 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 654 कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 215 कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर 22 सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटांसाठी मोठी धोकादायक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. महावितरणमधील सर्व वयोगटातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी आरोग्य खाते व स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. पुणे प्रादेशिक विभागातील 18 हजार 166 नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 2540 जणांनी लस घेतली आहे. येत्या 15 दिवसांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालयप्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
गेल्या मार्च महिन्यात अतिशय खडतर व आव्हानात्मक परिस्थिती असताना वीजग्राहकांच्या सहकार्याने वीजबिलांच्या माध्यमातून महसूल जमा करण्याचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी एकजुटीने कर्तव्य बजावले. वरिष्ठ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविला. याबद्दल प्रादेशिक संचालक नाळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येच मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरवात होत असल्याने पुन्हा एकदा खडतर परिस्थितीत काम करण्याचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे वेगाने करावीत तसेच वीजयंत्रणेमधील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करावा. मंडल कार्यालयांना सुरक्षा साधनांची आवश्यक खरेदीचे अधिकार देण्यात आले असून संबंधीत कर्मचाऱ्यांना त्वरीत आवश्यक असलेली सुरक्षा साधने देण्याची सूचना अंकुश नाळे यांनी यावेळी केली. वीजसुरक्षेबाबत संघटनांनी देखील वेबिनारद्वारे कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.