पाडव्याच्या मुहूर्तावर स्टुडिओ आर्केन येथे प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
पशु, पक्षी, प्राणी यांचा आदर करा, ते तुमचा आदर करतील आणि तुमचे संरक्षणही करतील, असा अनोखा संदेश देणारे कलात्मक प्रदर्शन रेल्वे ओव्हरब्रिजवरील बामणे संकुलमधील स्टुडिओ आर्केन येथे भरले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच सोमवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सदर प्रदर्शन दि. 17 ते 22 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना खुले आहे.
या प्रदर्शनाची संकल्पना पेशाने उद्योजक असलेले परंतु फोटोग्राफीचा छंद जोपासणारे संजय लद्दड यांची आहे. बेळगावमधील चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकार व अन्य कला जोपासणाऱया कलाकारांना क्यासपीठ मिळावे आणि त्यांची कलाकृती इतरांना पाहायला मिळावी, हा या छोटेखानी आर्ट गॅलरीचा उद्देश आहे. कोणतेही कलाकार येथे आपली कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवू शकतात, असे संजय लद्दड यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
या प्रदर्शनात ताडोबा व पांडवगड येथील अभयारण्यातील काही प्राण्यांचे लक्षवेधी फोटो, खास चिपळूण येथे जाऊन काढलेल्या दुर्मीळ पक्ष्याचा फोटो, ओडिसा येथील चिलका पक्ष्यांचा फोटो, याशिवाय केनियाच्या मसाईपारा येथे काढलेला स्थलांतरीत प्राण्यांचा फोटो, शिवाय अनेक चित्रकारांच्या निसर्ग चित्राकृती, व्यक्तिचित्रे, दृष्यचित्रे यांच्या सुंदर चित्राकृती आहेत.
प्रदर्शनाचा उद्देश काय? असे विचारता संजय म्हणाले, मला छायाचित्रे काढण्याचा छंद आहे. गेल्या तीन वर्षांत त्यावर अधिक लक्ष केंदित केले असून छायाचित्रे काढण्यासाठी पश्चिम घाट हे उत्तम ठिकाण आहे. शिवाय बेळगावमध्ये छायाचित्रे काढण्यासाठी असंख्य निसर्गरम्य ठिकाणे आहेत, हे महत्त्वाचे आहे.
बेळगावमध्ये उत्तम कलाकार आहेत. त्यांना वाव व व्यासपीठ देणे हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. सदर गॅलरी वर्षभर खुली असून कोणतेही कलाकार येथे आपली कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवू शकतात, असे संजय लद्दड यांनी सांगितले. याप्रसंगी सुप्रजा, शिल्पा खडकभावी आणि प्रगती लद्दड आदी उपस्थित होते.
प्राण्यांची छायाचित्रे काढण्यात विशेष रस
तीस वर्षांपासून किरण छायाचित्रांचा छंद जोपासत आहेत. प्राण्यांची छायाचित्रे काढण्यात त्यांना विशेष रस असून केनियाच्या मसाईपारा येथील प्राण्यांच्या स्थलांतराचे त्यांनी काढलेले छायाचित्र पाहण्याजोगे आहे. प्राण्यांची छायाचित्रे काढण्यात धोका असतो, असे म्हटले जाते. परंतु जोपर्यंत आपण प्राण्यांना उपद्रव करत नाही तोवर ते मनुष्याच्या वाटेला जात नाहीत, असे ते म्हणाले.
नवोदित कलाकारांशी संवाद
सदर प्रदर्शनात दररोज सायंकाळी विविध क्षेतातील तज्ञ मंडळींना निमंत्रित केले जाते. सायंकाळी त्यांच्या समवेत चित्रकार, नवोदित कलाकार यांच्याशी संवाद साधता येईल. सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना खुले आहे.