प्रतिनिधी/ बेळगाव
कलुती (ता. अथणी) येथील बस स्टॉपजवळ 1 लाख रुपये किमतीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. चंदनाची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून यावेळी दोघे जण फरारी झाले आहेत.
शिवनूरहून कलुतीकडे जाणाऱया मार्गावरील बस स्टॉपजवळ केए 29 एल 1748 क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन चंदनाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच मोटारसायकल अडविण्यात आली. पोलिसांना पाहताच दोघे जण मोटारसायकल व चंदनाचे लाकूड असलेली पिशवी येथेच टाकून फरारी झाले. मोटारसायकलवर 30 किलो 660 ग्रॅम चंदन आढळून आले आहे. चंदनाचे 17 तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
श्रीकांत अण्णाप्पा नाईक, परसु मारुती नाईक (दोघेही रा. कलुती-नाईकवाडी, ता. अथणी) अशी पोलिसांना पाहताच फरारी झालेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, जीप चालक बी. बी. इंगळगी व त्यांचे सहकारी फरारी जोडगोळीचा शोध घेत आहेत.
चंदन व मोटारसायकल तेथेच टाकून फरारी झालेल्या दोघा जणांवर अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भा.दं.वि. 379 व कर्नाटक वन संरक्षण कायदा 86 व 87 अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून या जोडगोळीने चंदनाचे लाकूड कोठून आणले, याचा तपास करण्यात येत आहे. त्या दोघांना अटक झाल्यानंतरच बरीच माहिती उघडकीस येणार आहे.